प्लॅटफॉर्म...
प्लॅटफॉर्म नं. ७ ... प्रत्येकाची धडपड. धडपड प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी. असं म्हणतात आजचं युग वेगवान युग आहे. प्रत्येकजण इम्पेशन्ट... ओव्हरव्ह्यू घेतला तर रॅटरेसचं दृष्य दिसतं. प्रत्येकाला गतिशी जुळवून घ्यायचंय. कुणी धावतो, कुणी जुळवून घेतो, कुणी लोळवला जातो, कुणी शिव्या हासडतो पण अशाने ती अनामिक गती शांत होत नाही. किंबहूंना तिच्यावर काही परिणामही होत नाही. पण परिणाम होतो. परिणाम होतो तो मानसिकतेवर...मुद्द्यांवर... महत्त्वाचे असे विषय अशाच वेगवान माहितीच्या सो कॉल्ड क्रांतीकारी प्रवाहात (गर्दीत) चिरडले जातात. वेळेवरची लोकल सुटल्यासारखे खिन्न होऊन स्टेशनवर बसून राहतात. आरूढ होणं त्यांच्या रक्तात असतं पण गर्दीत हाच गुणधर्म घामासारखा सतत निथळत रहातो. त्याला आस असते ती गतिची. वेग, आवेग, जोश, गतिशी स्पर्धा करणारा हा गुणधर्म लोकलच्या दारावर हिंदकळणाऱ्या पोराच्या बिन बटणाच्या शर्टासारखा वाऱ्यावर असतो. त्याला वाली असा कुणीच नाही. अशा मुद्द्यांना विषयांना गरज आहे ती प्लॅटफॉर्मची... ७ नंबरवरून अशाच मनातल्या, गर्दीतल्या विषयांना मांडण्याचा प्रयत्न, मग ती विचारांची असो वा माणसांची. चला ट्रेन आली...
No comments:
Post a Comment