Wednesday, 24 April 2013

हाय डेफिनेशनच्या दिशा



केबलवरचे अस्पष्ट चित्र अन खरखरणारा आवाज म्हणजे कटकटीचा विषय. परंतू नुकत्याच होत असलेल्या डिजिटायझेशनमुळे टि.व्ही आवाज आणि चित्राच्या बाबतीत सुस्पष्ट होतोय. आता आपण पहात असलेल्या टि.व्हीवरच्या सिरीअल्स अथवा जाहिराती ह्या एस.डी म्हणजेच स्टॅंडर्ड डेफिनेशनमधल्या साधारण प्रकारच्या आहेत. पण अशातही काही जाहिराती आणि चित्रपट त्यांच्या देखणेपणामुळे भाव खाऊन जातात आणि कायम लक्षात राहतात. एच.डी ऍनिमेशन असलेला ‘लाईफ ऑफ पाय’ असो वा आता चालू असलेल्या आयपीएलच्या सहाव्या हंगामाची ची ‘कोई नही बचेगा’ची जाहिरात ही प्रेक्षकांना ऐकण्याचा व पाहण्याचा आनंद देणारी आहे. रंगपंचमीची थिम असलेली ही सुस्पष्ट जाहिरात पाहताना अंगावर विविध रंगांचे फुगे वेगवेगळ्या प्रकारे फुटतानाचा दृकश्राव्य स्वरूपाचा आनंद प्रेक्षकाला एच.डी (हाय डेफिनेशन) तंत्रामुळे मिळतो.
डिस्कव्हरी आणि नॅट जिओच्या माध्यमातून एच.डी तंत्रज्ञानाने भारतीय प्रेक्षकांच्या घरात पहिले पाऊल ठेवले. त्यामुळे आता एच.डी हा विषय फक्त टी.व्हीवरील चॅनल्स अथवा जाहिरातींपुरताच मर्यादित नाही. आता तर एच.डी सिरीअल्स, एच.डी चित्रपट, एच.डी वाहिन्या (डिस्कव्हरी, नॅट जिओ), एच.डी सेटटॉप बॉक्स, स्मार्ट टि.व्ही, गेम्स, मोबाईल्सपर्यंत एच.डीचे जग विस्तारले आहे. थोडक्यात एच.डीमुळे उत्कृष्ट दर्जाच्या चित्रप्रतिमा आणि आवाज प्रेक्षकांना पाहता-ऐकता येणार आहेत. त्यामुळे टि.व्ही बघण्याचा नाही तर ‘पाहण्याचा’ आणि ‘ऐकण्याचा’ विषय होणार आहे.
टेलिव्हिजन क्षेत्रातला एस.डी ते एच.डी असा प्रेक्षकांचा प्रवास सध्या होत आहे. सेट मॅक्सचे बिझनेस हेड निरज व्यास या विषयावर बोलताना म्हणाले की, सेट मॅक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना एच.डी तंत्रज्ञानाबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी आयपीएलच्या पाचव्या हंगामापासून टी२०चे सामने एच.डीमध्ये प्रेक्षकांना दाखवण्याची सुरूवात आम्ही केली. जागतिक स्तरावर एच.डीची बाजारपेठ ही विकासाच्या अवस्थेत आहे. भारतातही सध्या तेच दृष्य आहे. सध्या भारतात एच.डीचे १२ ते १४ लाख उपभोक्ते आहेत. एच.डी तंत्रज्ञानाचा आस्वाद घेण्यासाठी डिजीटायझेशन आवश्यक आहे. त्यामुळे सरकारतर्फे शहरांमध्ये जसजसे डिजीटायझेशन होत जाईल तसतसा एच.डीला वाव मिळत जाईल. त्यासाठी चॅनलपातळीवर प्रोत्साहनपर प्रयत्नही चालू आहेत. सध्या एच.डी चॅनल्सच्या बाबतीतली सबस्क्रायबर पद्धत लक्षात घेता सगळ्या एच.डीला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास तांत्रिकदृष्ट्या अडचण आहे.
एकुणच याबाबतीत सज्ञान होण्यासाठी प्रेक्षकांना/उपभोक्त्यांना अजून दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. डिजीटायझेशनच्या तांत्रिक अडचणीमुळे एच.डी चॅनल्सनी रेव्हेन्यू मॉडेल अजून सेट केले नाही. ते झाल्यावर डिजीटायझेशननंतर एच.डी तंत्रज्ञान पूर्ण जोमाने पोहोचण्यास मदत होईल. त्यानंतरच वापरकर्त्यांना एच.डी तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल. त्यासाठी प्रेक्षकांनीही तयारी ठेवावी.

No comments:

Post a Comment