सतत मोबाईलची टिव टिव...
दिवसभर डोकं मोबाईलमध्ये !
मोबाईल वाजला रे वाजला की
पाहिलाच पाहिजे. सतत मोबाईल हातामध्ये. मोबाईल दूर असला की अस्वस्थ व्हायला होतं.
काही विशेष नसलं तरी हातामध्ये मोबाईलची चाळवाचाळव सुरू असते. रस्ता क्रॉस करताना भरधाव
गाड्यांकडे दुर्लक्ष करून किंवा अगदी ट्रेनमधल्या धक्काबुक्कीतही तोल सावरत किंवा
त्याच्याशी तिच्याशी चॅट करण्याची धडपड सुरू असते. जो चॅट करत नसेल त्याला ग्रूप
चॅटमध्ये ऍड करून बोलतं करण्याचा प्रयत्नही केला जातो. कॉलेजिअन्सचा विषय तर
सोडूनच द्या. अगदी सकाळी उठून ऑफिसचा रस्ता धरेपर्यंत गुडमॉर्निंग आणि
इन्स्पिरेशनल मेसेजेसचा मारा सतत सुरू असतो. दुपारी संता बंताचे मेसेजेस
संध्याकाळी इमोशनल आणि रात्री गुड नाईटच्या अंधारात दिवसाअखेरीस नकळत आपल्याला
चॅटिंगचं व्यसन लागलंय याचा कित्येकांना थांगपत्ताही नसतो.
ऑफिस पीसीवर फेसबूक, जी टॉक
आणि मोबाईल, टॅबवर व्हॉट्सऍप, बीबी, वी-चॅट लाईन अशी किती नावं
घ्यावीत? चॅटिंग ऍप्समध्ये आपण सगळेच अडकलेलो असतो. संपर्कक्रांतीच्या नावावर आपलं
महत्वाच्या वेळेचं स्वातंत्र्य आपण हरवतो आणि त्याची जाणीव करून द्यायला
आई-वडीलांची बोलणी आणि सिनिअर किंवा बॉसची ब्रिफिंग. यांचा तात्पूरता इफेक्ट होतो.
मग घरी सायलेंट मोडवर आणि ऑफिसमध्ये सुमडीत चॅटिंग सुरू असतं. बाहेर असलो की खिशातला मोबाईल
हातात घट्ट धरला जातो. खरं तर चॅटिंगच्या ऍडिक्शनने आपल्यालाही तेवढंच घट्ट धरलेलं
असतं.
‘नोमोफोबिआ’ म्हणजेच मोबाईल
जवळ नसल्यावर येणारा मानसिक ताण होय. हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. गुगल
प्लेवर ‘नोमोफोबिआ’ या नावाचे ऍपही आहे ज्याद्वारे आपल्याला आपण आपल्या मोबाईलच्या
स्क्रीनकडे किती वेळ पाहतो, किती वेळा मोबाईल चेक करतो त्याचा ग्राफ आपल्याला
कळतो. त्याचप्रमाणे फेसबूक एडिक्ट, व्हाट्सऍप एडिक्ट, लाईन एडिक्ट, फोन एडिक्ट या
नावानेही ऍप्स उपलब्ध आहेत. जेणेकरून चॅटिंगची सवय मोडायला यांची मदत होईल.
‘किशोरवयीन मुलांचे मोबाईलचे
व्यसन त्यांना समाजाशी जोडायला तसेच दुरावायलाही तितकेच कारणीभूत आहे. नवीन
तंत्रज्ञानामुळे किशोरांची समाजाशी जोडले जाण्याची पद्धत ही आधीच्या पिढीपेक्षा
नक्कीच वेगळी आहे. समाजाशी जोडले जाण्याची शक्यता मोबाईलद्वारे जास्त असली तरी
प्रत्यक्षात मात्र मल्टीटास्कींगच्या नादात सभोवतालाशी संबंध तुट्ण्याचीही शक्यता
तेवढीच असते. मल्टीटास्कींगचे कौशल्य वाढवण्यासोबतच मोबाईलशी चिकटून राहण्याची
शक्यता तेवढीच वाढीस लागते परिणामी आधीच्या पिढीला जी शांतता लाभत होती ती
सध्याच्या पिढीला दुरापास्त होऊन बसली आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवणे महत्त्वाचे.
कोणत्याही गोष्ट अति करणे हे नेहमी घातकच. त्यामुळे नियंत्रण ठेवून संपर्क
साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास ते नेहमीच उपयुक्त ठरेल’, असे गपशप डॉट
कॉमचे वाईस प्रेसिडेंट रवि सुंदरराजन म्हणतात.
चॅट्सच्या येण्याच्या
सारख्या व्यत्ययामुळे अभ्यास, ऑफिसमधील काम, पर्सनल लाईफ यांच्याबाबतची
विचारप्रक्रिया तुटली जाते. विषयाचं गांभीर्य नसल्याचं चित्र तयार होतं. डेडलाईन
आणि जबाबदारीचं भान आल्यावर काम उरकण्यावर भर दिला जातो. कामाचा दर्जा घसरतो. परिणामी
त्याचे शेरे मार्कशिट, ऑफिस अप्रेजल, घरच्यांना वेळ न दिल्यामुळे होणारा विसंवाद
याद्वारे उमटतात. साहजिकच या गोतावळ्याचा परिणाम हा मानसिक आरोग्यावर होतो शिवाय
शारिरीकही आरोग्यावरही.
त्यामुळे एखादया मित्राने
कामाच्या वेळेत पिंग केलं तर कामात आहे असं सांगायला ऑकवर्ड वाटायला हवं की प्राऊड
फिलिंग हे आपआपलं ज्याने त्याने ठरवावं.
- तुषार भामरे
tusharbhamre@gmail.com
No comments:
Post a Comment